कायद्यात सुधारणेविरोधात याचिकांच्या एकत्रित सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By Aajtakkhabar Admin 21 October 2022
Aajtakkhabar:केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात केलेल्या सुधारणांविरोधात देशभरात दाखल झालेल्या दाव्यांची एकत्रित सुनावणी घेण्याची रिझव्र्ह बँकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या संदर्भात देशातील विविध न्यायालयांत दाखल खटल्यांवर एकत्रित मद्रास उच्च न्यायालायत सुनावणी घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
पीएमसी बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या घोटाळय़ाच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२० मध्ये याबाबतचे सुधारणा विधेयक संसदेत संमत करण्यात आले. मात्र या कायद्याच्या माध्यमातून सरकारने सहकारी बँकांवर अन्यायकारक आणि कठोर निर्बंध लागू केल्याच्या तसेच या कायद्याचा आधार घेत रिझव्र्ह बँकेने सरकारी बँकांसाठी लागू केलेल्या विविध जाचक नियमांच्या विरोधात अनेक राज्यांतील सहकारी बँका आणि त्यांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. ‘महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’नेही या कायद्यातील सुधारणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.रिझव्र्ह बँकेने मात्र या सर्व याचिकांची वेगवेगळय़ा उच्च न्यायालयाऐवजी एकत्रित सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची विनंती याचिकेद्वारे केली होती. १४ ऑक्टोबरला न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी आमच्या याचिकांवर आधी उच्च न्यायालयातच सुनावणी व्हावी अशी मागणी करीत याचिकाकर्त्यांनी रिझव्र्ह बँकेच्या याचिकेस विरोध केला. त्यानुसार या सर्व याचिकावर एकत्रित मद्रास उच्च न्यायालायत स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून विविध राज्यांत दाखल झालेल्या २५ जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरातील विविध न्यायालयांत दाखल याचिकांची एकत्रित सुनावणी होणार असल्याने या प्रकरणाला गती मिळेल आणि आम्हाला न्याय मिळेल, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
Edited by:Sachin Lahudkar
BvkaXALzeqHC
JWVjYveKHfZ