Aajtakkhabar:जालना- येथील औद्योगिक वसाहत परिसरातील एका बँकेचे ए टी एम मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मध्यरात्री दोन च्यासुमारास घडली आहे. एका पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमध्ये टाकून हे मशीन चोरट्यांनी लंपास केले आहे.
जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेलगत याच बँकेचे डायबोल्ड कंपनीचे एटीएम मशीन आहे. आज भल्या पहाटे चोरट्यांनी 1. 14 ते 2.00 वाजेच्या सुमारास हे एटीएम मशीन लंपास केले आहे.
त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे एटीएम मशीन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियोमध्ये टाकून नेताना चोरटे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे मोठी रक्कम या एटीएममध्ये ठेवण्यात आली होती. या एटीएममध्ये रोख 28 लाख 67 हजार 600 रुपये होते._ या रक्कमेसह 4 लाखाचे मशीन असा 32 लाख 67 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी तक्रार दिली असून, चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धाडशी घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.